उन्हाळी सुट्टीत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस मार्गावर
मुंबई: उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) यंदा उन्हाळी सुट्टीच्या काळात 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार असल्याची घोषणा केली आहे.
उन्हाळी सुट्टीत चाकरमानी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर गावी जातात. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त एसी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार बसेस?
मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणांहून या वातानुकूलित बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रमुख मार्गांमध्ये पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, बीड, नागपूर, अहिल्यानगर यांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल आणि परळ आगारातूनही अतिरिक्त बससेवा उपलब्ध होणार आहे.
खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर
उन्हाळी सुट्टीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांकडून भरमसाट भाडे घेतात. त्यामुळे प्रवाशांना अधिक परवडणाऱ्या आणि सुरक्षित सेवेकडे वळण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
लाल परी ताफ्यात मोठी भर
याशिवाय, एसटी महामंडळ लवकरच 2640 नवीन ‘लाल परी’ बसेस ताफ्यात दाखल करणार आहे. दर महिन्याला 300 नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत, ज्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि परवडणारी सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.