महाराष्ट्रात ‘योगी पॅटर्न’: दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसानभरपाई!
चार दिवसांत दंगलग्रस्त नागरिकांना मदत; पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावर परिणाम नाही
नागपूर: नागपूरसारख्या शांत शहरात १७ मार्चला उसळलेल्या दंगलीने अनेकांचे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या दंगलीत नुकसान झालेल्या नागरिकांना येत्या चार दिवसांत भरपाई दिली जाईल. मात्र, ही भरपाई जनतेच्या पैशांतून नव्हे, तर दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल केली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, औरंगजेबाच्या प्रतीकात्मक कबर जाळल्यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या. त्यामुळे सायंकाळी जमावाने हिंसाचार सुरू केला. वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांवर हल्ले करण्यात आले. मात्र, पोलिसांनी चार ते पाच तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आतापर्यंत १०४ जणांना अटक करण्यात आली असून, यात ९२ आरोपी आणि १२ विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची विधाने:
✅ “दंगलीच्या सूत्रधारांचा शोध सुरू!”
– या दंगलीत परकीय हस्तक्षेप आहे का, हे तपासानंतर स्पष्ट होईल.
✅ “महिला पोलिसांचा विनयभंग नाही!”
– महिला पोलिसांवर हल्ला झाला, मात्र, अभद्र वर्तन झाल्याचे स्पष्ट पुरावे नाहीत.
✅ “पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर परिणाम नाही!”
– ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार असून, कार्यक्रमात कोणताही बदल नाही.
✅ “गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे!”
– हिंसाचार टाळण्यासाठी गुप्तचर विभाग अधिक चांगली माहिती पुरवू शकला असता.
हिंसाचारात एकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल
या दंगलीत गंभीर जखमी झालेल्या इरफान अन्सारी (३८, रा. बंदे नवाजनगर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या हत्येप्रकरणी संतोष श्यामलाल गौर (४८, रा. खदान) याला अटक करण्यात आली आहे.
नागपूरकरांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.