बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीचा राज्यातील पहिला मॉल रत्नागिरीत उभारण्यासाठी प्रयत्न : उदय सामंत
रत्नागिरी :- बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीचा राज्यातला पहिला मॉल येत्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दापोलीत केले. उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सरस प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
एका जिल्ह्यात दोन सरस प्रदर्शने भरवण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर प्रथमच गणपतीपुळ्यानंतर दापोलीला हे प्रदर्शन भरवण्याचा मान मिळाला. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
बचत गटांची उत्पादने चांगल्या प्रतीची असली पाहिजेत. प्रशिक्षण ही महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पॅकेजिंग आणि विपणनासारख्या बाबींचे प्रशिक्षण मिटकॉनसारख्या संस्थेच्या माध्यमातून बचत गटांना दिले जाईल, असेही ते म्हणाले.