मार्गताम्हानेत काजू बागेला आग; लाखोंचे नुकसान
तळवली (मंगेश जाधव)
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द येथे सोमवारी रात्री मद्यपींकडून लावण्यात आलेल्या आगीत बागायतदार देवीदास गुणाजी चव्हाण यांची १५० काजूची झाडे होरपळली. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. चव्हाण यांनी या घटनेची तक्रार पोलीस पाटील आणि तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे केली आहे.
मार्गताम्हानेच्या विस्तीर्ण माळरानावर दरवर्षी वणवे लागण्याच्या घटना घडतात. यातील काही वणवे जाणूनबुजून लावले जात असल्याची शक्यता आहे. अलिकडे माळरानावर शेतकरी आणि बागायतदारांनी आंबा आणि काजूची फळलागवड केली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी ही ठिकाणे मद्यपींचे अड्डे बनत चालली असून, त्यांच्याकडून आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत.
चव्हाण यांची काजू बाग मार्गताम्हाने इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मागे राईचा पट्टा क्षेत्रात ६० गुंठे जमिनीवर आहे. सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास काही मद्यपी तेथे मद्यपान करताना आढळून आले होते. मात्र, संशय आल्याने ते घटनास्थळावरून पळून गेले.
या आगीमुळे चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि बागायतदारांनी केली आहे. संबंधित घटनेचा तपास पोलीस करत आहेत.















