रत्नागिरीत ब्राऊन शुगरसह एक जण अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर गस्तीदरम्यान ७७,५०० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त; एन.डी.पी.एस. अंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी – जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला गती देत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांनी रामनवमीच्या गस्तीदरम्यान एक मोठी कारवाई करत अरमान आदिल अशरफ शेख या तरुणास अटक केली. खाना खजाना हॉटेलजवळ, ६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयास्पद हालचाली करताना सापडलेल्या या आरोपीकडून १५ ब्राऊन शुगरच्या पुड्या आणि इतर साहित्य असा ७७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक १०३१/२०२५ नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोहवा शांताराम झोरे, बाळू पालकर, दिपराज पाटील व गणेश सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही घटना जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या साखळीवर पोलिसांनी ओढलेली धडक कारवाई मानली जात असून, त्यामुळं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
#RatnagiriCrimeNews #DrugBustRatnagiri #BrownSugarSeizure #NDPSAct #PoliceActionRatnagiri #MaharashtraPolice #AntiDrugCampaign #CrimeReport #RatnagiriNews #KonkanNews #RamNavamiSecurity