प्रीत तुला कळली नाही…
अनकही भावना….
प्रेम, आठवणी आणि एक अनपेक्षित भेट...
लेखन: सुजित सुर्वे –
प्राची ही एक भावनिक स्वभावाची मुलगी. पाच वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं आणि आता ती एका गोंडस चिमुरडीची आई आहे. शहरातलं धावपळीनं भरलेलं आयुष्य काही दिवसांसाठी मागे टाकून ती आपल्या माहेरी, आज ती सुंदर, निसर्गमय गावात आलीये….. खूप वर्षांनी माहेरी, आलेली प्राची आणि तिच्या सोबत आलेली नात पाहून तिच्या आईचा आनंद गगनात मावेनासा होतो.
आई पुढे येऊन छोट्या परी ला जवळ घेऊन प्रेमाने तिचा पापा घेते आणि आत मध्ये त्यांच्या साठी नाश्ता-पाण्याची तयारी करू लागते. आणलेलं सामान बॅग पर्स तिथेच टेबळावर ठेऊन,घाई घाई ने प्राची फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळते आणि छोटी परी आज्जीच्या मागून खाऊ साठी किचन मध्ये पळत जाते…. प्राची नुकतीच फ्रेश होऊन चेहरा टॉवेल्स ने पुसत खिडकीतून बाहेर डोकावत असतें .. .. इतक्यात एक चिरपरिचित चेहरा अंगणात दाखल होतो — तिची बालमैत्रीण ‘निशा.
“प्राची!” निशा आनंदाने ओरडते, आणि दोघी मैत्रिणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. वर्षांनी भेट झाल्याचा आनंद त्यांना गप्पांमधून ओसंडून वाहतो…. प्राची – अगं किती तुला सकाळ पासून फोन करतेय… मेसेज टाकलेत…. नशीब आलीस निश अगं हो मी निघालेच होते… वाचला मेसेज तुझा…गाडीवर असल्याने फोन घेतला नाही सॉरी.
त्या दोघींच्या गप्पा रंगात असताना, प्राचीची आई गरम पोहे आणि चहा घेऊन येते. नाश्त्या आणि चहा च्या घोटाबरोबरच जुन्या आठवणीही सगळ्या पुन्हा जाग्या होतात.
निशा सहजच म्हणते, “अभिजितचा उद्या वाढदिवस आहे गं. त्याचा सकाळी मला फोन आला होता.”
अभिजितचं नाव ऐकताच प्राची क्षणभर थबकते. डोळ्यात टचकन पाणी येतं. तिच्या मनातल्या जुन्या जखमा पुन्हा उघडतात. कॉलेजचे दिवस, अभिजितवरचं एकतर्फी प्रेम, त्याचं तिला टाळणं… सगळं पुन्हा समोर येतं.
“चल ना त्याला wish करायला जाऊ उद्या. तुला बघून त्यालाही धक्का बसेल!” – निशा हसून म्हणते.
प्राची हलकंसं स्मित करत हो म्हणते, तिला ही खूप वर्षांनी त्याला पहायच होत. पण तो ओळखेल का पुन्हा? आठवणीत असेल का मी? तिच्या ही मनात गोंधळ आहे. रात्री ती थकून झोपते, पण मनात अभिजित चा चेहरा घोळत राहतो.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळ…..

एक ओळखीचं गार्डन. तिथे अभिजित आणि निशा भेटतात. अभिजितला काहीच कल्पना नसते की आज एक खास surprise त्याची वाट पाहतंय.
थोड्याच वेळात प्राची तिथे येते. त्याच्या समोर उभी राहते. अभिजित क्षणभर शून्यात पाहत राहतो. डोळ्यात पाणी तरळतं. दोघंही काही न बोलता एकमेकांच्या मिठीत शिरतात. खूप काही न बोलताही त्यांची मनं एकमेकांशी बोलत राहतात. फक्तं डोळ्यांनी बोलत राहतात……
निशा हे सगळं पाहून गहिवरते नकळत तिच्या हि डोळ्यातून पाणी टपकत, ती बाजूला सरकते — त्या दोघांना थोडा वेळ देण्यासाठी.
अभिजित हलक्या आवाजात, डोळे पुसत म्हणतो:
“प्राची… तू माझ्यासमोर उभी आहेस, पण हे खरं वाटत नाहीये. मी कित्येकदा कल्पना केली होती… की तू समोर येशील, पण हे असं होईल असं वाटलं नव्हतं.”
प्राची थोडं हसत, पण डोळ्यात पाणी लपवत म्हणते:
“कधी वाटलंच नाही की तू असा बोलशील. तू तर कायम दुर्लक्ष केलंस… पण मन मात्र तुझ्याशी गप्पा मारत राहायचं.”
काही क्षण दोघेही शांत असतात… पण पुन्हा स्वतःला सावरात….
अभिजित:
“माझी चूक होती. प्रेम होतं, पण भीती होती. मित्र म्हणून हरवण्याची… आणि तुझ्या नजरेतल्या प्रेमाला उत्तर देण्याची लायकी आहे की नाही याचं टेंशन… पण आज जेव्हा तू समोर आलीस, तेव्हा सगळं ओघवत्या पाण्यासारखं वाहून गेलं.”
प्राची थोडी वेळ शांत राहते. मग अलगद त्याचा हात हातात घेऊन म्हणते:
“कधी कधी प्रेमात व्यक्त होणं महत्त्वाचं नसतं अभिजित. काही नात्यांना ‘आपलं’ म्हणण्यासाठी शब्दांची गरज नसते. तू माझं पहिलं प्रेम होतास… आणि कायम राहशील. पण आता मी वेगळ्या वाटेवर आहे, आणि मी तिथेही आनंदी आहे.”
अभिजित डोळे मिटून मान हलवतो:
“हो… आणि मला फक्त एवढंच हवंय की तू कायम हसत राहावी. काही गोष्टींना शेवट नसतो, पण त्यांचं अस्तित्व कायम राहतं.”
ते दोघं एकमेकांकडे पाहतात… डोळे पाणावलेले, पण मनात समाधान. मात्र हृदयातील अस्वस्थता कायम….
निशा दूरून त्यांना पाहते आणि हलकंसं हसते… तिच्या डोळ्यातूनही एक अश्रू लाटतो — आठवणींच्या आणि प्रेमाच्या सौंदर्याचा... फक्त तिलाच माहित होत प्राची त्यावेळी मनापासून अभिजित वर प्रेम करायची…..पण अभिजित च्या एकलकोड्या आणि थोड्या भित्रा स्वभावाने ही story पुढे गेलीच नाही.
💕 . कधी कधी अधुरं राहिलेलं प्रेमही मनात संपूर्ण होतं…
कारण काही भावना शब्दांपलीकडच्या असतात.😔
वरील लेखासाठी आपला अभिप्राय कळवा कथा लेखक – सुजित सुर्वे. wp – 9970971655
अभिप्राय…
लेखक सुजित सुर्वे यांची “प्रीत तुला कळली नाही…” ही कथा नुकतीच माझ्या वाचनात आली. शीर्षक वाचताच मनात एक हळुवार उत्सुकता जागी झाली — “खरंच, प्रीत कधी कळत नाही का?” आणि मग कथा वाचायला घेतली, तेव्हा त्या अनकथ प्रेमाच्या प्रवाहात मीही नकळत ओढला गेलो. ही कथा म्हणजे प्रेम, आठवणी, स्नेहबंध आणि मनाच्या कप्प्यात दडलेल्या भावना यांचं एक संवेदनशील आणि हृदयस्पर्शी चित्रण आहे. लेखनशैली इतकी मर्मभेदी आहे की वाचताना प्रत्येक वाक्य मनाला अलगद स्पर्शून जातं — जणू आपणच त्या प्रसंगाचा एक भाग आहोत. कथेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शांत, कोवळी भावना. यात कुठलाही अतिरेकी नाटकीपणा नाही… आहेत त्या नजरेतल्या भावना, न बोलता व्यक्त होणारी अस्वस्थता, आणि अधुर्या प्रेमाची सहज कबुली. ही कथा वाचल्यानंतर स्वतःच्या आयुष्यातल्या काही निवांत, पण खोलवर रेंगाळलेल्या आठवणी जाग्या होतात. म्हणूनच, या कथेनं मनात घर केलं आणि तिच्यावर चिंतन, मनन आणि अभिप्राय लिहावसा वाटला — कारण अशा कथा फक्त वाचायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. ही कथा केवळ एक प्रेमकथा नाही… ती हळूहळू मनात उतरून, भावना शब्दांपलीकडे पोहोचवणारा एक अनुभव आहे. आपणही वेळ काढून नक्की वाचा. © गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई (जेष्ठ पत्रकार) …….. ही कथा म्हणजे संवेदनशील , मनाला घातलेली एक साद आहे.एक हळुवार निरागस दोन जीवांची प्रेम कथा आहे.ही कथा वाचल्यानंतर प्रत्येकाला आपल्या जीवनात घडलेली ही घटना आहे असे वाटते .आपला भूतकाळ डोळ्यासमोर येतो. पुढे काय घडणार आहे याची उत्कंठा मनाला लागून राहते प्रेम कथा लिहिणे ही खूप अवघड गोष्ट आहे पण त्या व् व्यक्ती ने तो प्रसंग त्याच्या जीवनात अनुभवला असावं कदाचित म्हणूनच अतिशय चांगल्या पद्धतीने कथा रेखाटलेली आहे सुजित खरच,आपण अत्यंत प्रतिभावंत कथाकार आहात आपल्याला कथा लेखनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. © डॉ.मनोज नरसी पाटील, मुख्याध्यापक – वेलदूर नवानगर शाळा.
|

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators