गुहागर लोकशाही दिनात खड्ड्यांचा सवाल तापला – प्रशासनाकडून दोन दिवसात उत्तर देण्याचे आश्वासन!
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांवर तीव्र संताप; सक्षम अधिकाऱ्यांना जनतेसमोर बोलावणार – नायब तहसीलदार मेहता यांचे आश्वासन
आबलोली (प्रतिनिधी – संदेश कदम)
गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा गुहागर लोकशाही दिनाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी या अपुऱ्या रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर जोरदार आवाज उठवला.
या संदर्भात नायब तहसीलदार मेहता मॅडम यांनी आश्वासन दिले की, “राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सक्षम अधिकारी यांच्याशी बोलून येत्या दोन दिवसात त्यांना जनतेसमोर हजर केले जाईल.”
यावेळी पत्रकार पराग कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ रहाटे, अनिल शिंदे, सतीशदादा शेटे, सुमित आठवले, अभिजित मर्दा, विकास जाधव, अमित जोशी, अरुण भुवड, सखाराम अवेरे यांनी एकत्रितपणे ३० एप्रिलच्या आत रस्ता चांगल्या प्रतीने कार्पेट करून द्यावा, अन्यथा पुढील आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, अशी ठाम मागणी केली.
गुहागर नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२४ मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी निवेदन दिले गेले होते, आणि त्यानंतर रिमाइंडर लेटर देखील देण्यात आले आहे. तरीही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
रस्त्याचा अपघात प्रवणपणा वाढला असून, तो तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
लोकशाही दिनात अन्न सुरक्षा अधिनियम 2003 चा लाभ मिळत नसणे, गुहागर नगरपंचायत हद्दीतील निष्क्रिय जागा नावावर वर्ग न होणे, तसेच शहरातील घरांवर आलेली झाडे तोडण्याची गरज या बाबींबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.
हा लोकशाही दिन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला, आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीची झलक अनुभवायला मिळाली. शेवटी नायब तहसीलदार मेहता मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
हॅशटॅग्स:
#गुहागर #लोकशाहीदिन #राष्ट्रीयमहामार्ग #खड्ड्यांचा सवाल #NHAI #GuhagarRoadIssue #KonkanDevelopment #PublicDemand #LocalAdministration