अक्षय्य तृतीयेला मिळणार एप्रिलचा हप्ता! लाडक्या बहीणींसाठी आदिती तटकरे यांची खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील हप्ता एप्रिल संपण्यापूर्वी खात्यावर; पात्र महिलांना दिलासा
पुणे – महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या लोकप्रिय योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर महिन्याअखेरीस म्हणजेच अक्षय्य तृतीयेला मिळणार आहे, अशी महत्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ही योजना महायुतीच्या विजयामध्ये गेमचेंजर ठरली होती. योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. महायुतीने सत्तेत आल्यावर दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या 1500 रुपयांचाच हप्ता मिळत असल्याने विरोधकांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना तटकरे यांनी स्पष्ट केले की, “जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो. त्यानुसार टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल.”
तटकरे म्हणाल्या, “एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर महिना संपायच्या आत म्हणजेच अक्षय्य तृतीयेला जमा होईल. योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही कुचराई नाही. पात्र महिलांनाच लाभ मिळतो.”
या योजनेत काही महिलांना 1500 रुपये आणि काहींना 500 रुपये मिळतात याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जातात. शासनाचा उद्देश आहे की एकूण मिळकत किमान 1500 रुपये असावी.”
सध्याचे आकडेवारीनुसार:
लाभार्थी महिला: 2 कोटी 47 लाख
अंमलबजावणी सुरू: जुलै 2024 पासून
आतापर्यंत मिळालेली एकूण रक्कम: 9 महिन्यांचे 13500 रुपये
फेब्रुवारी व मार्च 2025 चे हप्ते एकत्र करून 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वितरित करण्यात आले होते. आता अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने एप्रिलचा हप्ता मिळणार असल्याने अनेक महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
#माझी_लाडकी_बहीण #महिला_कल्याण #अदिती_तटकरे #महायुतीसरकार #नमो_शेतकरी #अक्षय्यतृतीया2025 #RatnagiriVartahar