महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल आणि भीमराव पांचाळे यांना राज्य शासनाचे मानाचे चित्रपट पुरस्कार
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कारांची घोषणा; लता मंगेशकर पुरस्कारासाठी भीमराव पांचाळे यांची निवड
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार, स्व. राज कपूर जीवन गौरव व विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचा समावेश आहे.
चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार यंदा नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. तर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांना अनुक्रमे रु. १० लाख व ६ लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक दिले जाणार आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार यंदा प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना तर विशेष योगदान पुरस्कार अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूपही अनुक्रमे रु. १० लाख व ६ लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.
संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना मिळणार आहे. या पुरस्कारात रु. १० लाख, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल दिली जाते.
या पुरस्कारांसाठी निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य मंत्री समितीचे अध्यक्ष असून सदस्य म्हणून पं. ब्रिजनारायण, अशोक पत्की, सत्यशील देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, अंबरीश मिश्र यांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि संचालक समितीचे सदस्य व सचिव आहेत.
हॅशटॅग्स:
#MaheshManjrekar #AnupamKher #Kajol #MuktaBarve #BhimraoPanchale #LataMangeshkarAward #ShantaramAward #RajKapoorAward #MarathiCinema #MaharashtraGovernmentAwards