त्र्यंबकेश्वरमध्ये ५२ वर्षीय साधूची निर्घृण हत्या; संत समाजात तीव्र संताप
पोलीस ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करतात, महंत आक्रमक; दारू दुकानं बंद करण्याची मागणी
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – अध्यात्मिक नगरी त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ५२ वर्षीय साधूची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण संत समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित साधूवर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. मारहाण इतकी गंभीर होती की साधूचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतरही त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आल्याने महंत व आखाडा परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महंत आक्रमक – “हे साध्यासुधं प्रकरण नाही!”
या घटनेनंतर आखाडा परिषदेचे महंत संतप्त झाले असून, त्यांनी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सादर केले आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे मारहाण होत असल्याचे दिसत असूनही पोलीस ‘अकस्मात मृत्यू’ची केस दाखल करत असल्याचा आरोप महंतांनी केला आहे.
महंतांनी असा स्पष्ट आरोप केला आहे की, “दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनीच साधूंवर हल्ला केला आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. हे कुठलं अकस्मात प्रकरण?”
दारू दुकानं बंद करण्याची मागणी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वरमध्ये दारूच्या दुकानदारांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी तीव्र मागणी आता साधू-संतांकडून करण्यात येत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, धार्मिक नगरीत नशेखोरीला आश्रय देणं हे अध्यात्मिक परंपरेला धक्का आहे.
वातावरण तणावपूर्ण – प्रशासनाकडून शांततेचं आवाहन
ही घटना समजताच परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांततेचं आवाहन केलं असून, घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.