पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरास सुरुवात
खास वैशिष्ट्य – आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना विविध खेळ व फिटनेसचे प्रशिक्षण
वाटद-खंडाळा | प्रतिनिधी – निलेश रहाटे
पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा येथे २२ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत ‘खंडाळा अर्बन बँक’ पुरस्कृत उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर सुरू झाले आहे. या शिबिराचे उद्घाटन वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. राजेंद्रजी विचारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार दिवाकरशेठ जोशी, मुख्याध्यापक प्रा. शिवाजी जगताप, पर्यवेक्षक प्रा. आनंदा पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व परिसरातील विद्यार्थी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संस्कार हारगुले व सागर कोळी सर यांची उपस्थिती. त्यांचा सत्कार डॉ. विचारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यांच्यासह राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. राजेश जाधव व श्रीमती पल्लवी बोरकर हेही संपूर्ण शिबिरात खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत.
डॉजबॉल, हॉलिबॉल, क्रिकेट आणि शारीरिक फिटनेस या क्षेत्रात खेळाडूंना तांत्रिक व मानसिक मार्गदर्शन मिळणार आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. राजेश जाधव यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व पटवून देत जिद्द, मेहनत आणि शिस्त या गुणांचा खेळाडूंमध्ये असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
शिबिराचे संपूर्ण आयोजन व नियोजन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश जाधव आणि पल्लवी बोरकर यांनी केले असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर धोपट यांनी केले.
आयोजकांकडून परिसरातील सर्व विद्यार्थी व खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हॅशटॅग्स:
#SummerCamp2025 #PersonalityDevelopment #SportsCamp #WadadKhandala #RatnagiriNews #StudentDevelopment #खेल_और_विकास