सौ. अनिता नारकर यांना यमुनाबाई खेर पुरस्कार जाहीर
समाजसेवेतील योगदानाची दखल; रविवार २७ एप्रिल रोजी रत्नागिरीत पुरस्कार वितरण समारंभ
रत्नागिरी (संदीप शेमणकर) – श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे समाजसेविकेला दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार’ यंदा चिपळूण तालुक्यातील पेढे-पर्शुराम येथील आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अनिता आत्माराम नारकर यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार उद्या, रविवार २७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता डॉ. बा. ना. सावंत रोडवरील सर्वोदय छात्रालयातील मोरोपंत जोशी सभागृहात प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश माणिकराव सातव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गीते असतील.
दरवर्षी समाजसेवेच्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महिला समाजसेविकेला यमुनाबाई खेर पुरस्कार दिला जातो. यंदाचे पुरस्काराचे सोळावे वर्ष आहे.
सौ. अनिता नारकर यांचा जन्म गिरणी कामगाराच्या कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले असून, त्यांनी मुंबई महापालिकेत १९७८ ते २०१४ या कालावधीत सेवा बजावली. त्यांच्या दोन अपत्यांपैकी मुलगी आरती ही बौद्धिक दिव्यांग असून, तिने भारताचे प्रतिनिधित्व मॅरेथॉन स्पर्धेत केले आहे.
सेवानिवृत्तीनंतर सौ. नारकर यांनी २०१८ मध्ये पेढे-पर्शुराम येथे ‘आरती निराधार सेवा फाउंडेशन’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वृद्ध, दिव्यांग, निराधार आणि पीडित महिलांसाठी मोलाचे कार्य सुरू केले असून सध्या ४७ व्यक्तींचा सांभाळ कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय केला जात आहे. नुकतेच मालघर येथे देखील संस्थेचे कार्य विस्तारले आहे.
समारंभासाठी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, श्रीमती सोनवीताई देसाई, बाळकृष्ण शेलार, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, उपाध्यक्ष जयश्री बर्वे, कार्यवाह नरेंद्र खानविलकर यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
हॅशटॅग:
#अनिता_नारकर #यमुनाबाई_खेर_पुरस्कार #समाजसेवा #रत्नागिरी #चिपळूण #AartiNiradharSevaFoundation #Samajsevak #WomenEmpowerment #RatnagiriNews