शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलनात मराठा तेजाचा जल्लोष!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलनात मराठा तेजाचा जल्लोष!

भिवंडीच्या भूमीत शिवप्रतापाचे काव्यरूप साकारले

भिवंडी (गुरुदत्त वाकदेकर) :

मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर शौर्यगाथांचा जयघोष करणारे “शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलन २०२५” भिवंडीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. मराठी साहित्य व कला सेवा, राष्ट्रकुट, अखिल आगरी साहित्य विकास मंडळ (शाखा – भिवंडी) आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या स्पर्धात्मक कविसंमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सारस्वतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन, शौर्य, मर्दुमकी, सामाजिक आणि राजकीय कार्यावर आधारित वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. उपस्थित रसिकांनी त्या सादरीकरणांना भरभरून दाद दिली.

 

या कार्यक्रमात गुजरातमधील बडोदा येथून आलेल्या केतकी कुलकर्णी यांनी सुनिल पाटील यांची “शिवबा” ही ओजस्वी कविता सादर करत विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणाबद्दल त्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि सस्नेह भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही सादरीकरणानंतर मान्यवरांच्या हस्ते सस्नेह भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

 

*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:*

 

*प्रथम क्रमांक:* विवेक शेळके – रोख ₹३००१/-, शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र

 

*द्वितीय क्रमांक:* राजेश साबळे ओतूरकर – रोख ₹२००१/-, शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र

 

तृतीय क्रमांक: नंदा कोकाटे – रोख ₹१००१/-, शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र

 

उत्तेजनार्थ पारितोषिके:  मिथून गायकवाड, योगिता कोठेकर व अक्षता गोसावी – प्रत्येकी रोख ₹५०१/-, शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र

 

स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कवी, समीक्षक शिवाजी गावडे आणि प्रा. डॉ. राजेंद्र डोंगरदिवे यांनी त्यांच्या स्वतंत्र शैलींमध्ये केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविवर्य आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास थळे यांनी भूषविले, तसेच त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

 

या वेळी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजूभाऊ चौधरी, तसेच अध्यक्ष विश्वास थळे

हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

 

कार्यक्रमात रवींद्र तरे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत सादर करत वातावरण भारावून टाकले.

 

सुनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत पुढील उपक्रमांची रूपरेषा मांडली. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि नेमके सूत्रसंचालन कवयित्री निर्मला पाटील आणि साहित्यिक गुरुदत्त वाकदेकर यांनी संयुक्तपणे पार पाडले.

 

या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रकाश ओहळे (राष्ट्रकुट), कैलास अनंता भोईर (सरपंच), मच्छिंद्र पाटील, विक्रांत लाळे, रविंद्र शंकर पाटील, किरण जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

शिवाजी महाराजांच्या तेजस्वी वारशाला काव्याच्या माध्यमातून उजाळा देणारे हे पहिले स्पर्धात्मक कविसंमेलन प्रेरणादायी ठरले. भविष्यात अशा शिवशौर्यपर उपक्रमांची मालिका सुरू राहो, अशी अपेक्षा उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...