एसटी बसमध्ये राहिलेली रोकड, दागिने आणि साड्यांची पिशवी सुखरूप परत; चालक पटवर्धन यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
चिंद्रावळे येथील प्रवाशांची मौल्यवान पिशवी परत मिळाल्याने ग्रामस्थांकडून एसटी चालकाचे मन:पूर्वक आभार
तळवली (मंगेश जाधव)
रत्नागिरीहून गुहागर, नरवण, हेदवी मार्गे जाणाऱ्या एसटी बसमध्ये विसरलेली रोख रक्कम, दागिने आणि साड्यांची पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याने एसटी चालक श्री. पटवर्धन यांचे चिंद्रावळे गावात विशेष कौतुक होत आहे.
ही घटना 1 मे रोजी घडली. रामजी सखाराम मोहिते आणि त्यांची पत्नी सरिता मोहिते हे चिंद्रावळे बौद्धवाडीत उतरताना त्यांच्या मौल्यवान वस्तू असलेली एक पिशवी बसमध्येच विसरले. ही बस रत्नागिरीहून 2.45 वाजता सुटलेली होती. घरी पोहचल्यावर पिशवी नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गुहागर डेपोशी आणि एसटी चालक पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला.
चालक पटवर्धन यांनी पिशवी गाडीत सुरक्षित असल्याचे सांगून, ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मे रोजी सकाळी बौद्धवाडीत येऊन ग्रामस्थांसमोर मोहिते दांपत्याच्या स्वाधीन केली. सर्व वस्तू जशाच्या तशा असल्याचे पाहून मोहिते कुटुंबीय समाधान व्यक्त करत होते. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे चिंद्रावळेतील माजी मुख्याध्यापक सुर्वे गुरुजी व अन्य ग्रामस्थांनी एसटी चालक पटवर्धन आणि वाहकाचे आभार मानले.
हॅशटॅग्स:
#RatnagiriNews #STBus #PramanikChalak #LostAndFound #Chindrawale #Guhagar #STMahamandal #GoodSamaritan
फोटो