लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कन्या शांताबाई साठे यांचे निधन
कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्त्या, बलराज सहानींसह तुरुंगवास भोगलेला अनुभव; अण्णाभाऊंच्या साहित्य प्रवासाच्या साक्षीदारांचा ९० व्या वर्षी अखेरचा श्वास
बातमी – मंगेश जाधव
मुंबई | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कन्या, आणि आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षासाठी झटणाऱ्या कॉ. शांताबाई साठे-दोडके (वय ९०) यांचे रविवारी दुपारी कांदिवली येथील सेवन स्टार रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर बोरीवलीच्या दौलतनगर स्मशानभूमीत सायंकाळी ७.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
अण्णाभाऊ साठेंच्या दुसऱ्या पत्नी जयवंताबाई दोडके यांना शांता आणि शकुंतला या दोन कन्या. या बहिणींनी अण्णांच्या साहित्य आणि सामाजिक जीवनात खूप जवळून सहभाग घेतला होता. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी श्रद्धांजली पोस्टमध्ये सांगितले की, घाटकोपरच्या चिरागनगर झोपडपट्टीत 1958 मध्ये अण्णा ‘फकीरा’ कादंबरी लिहीत असताना, अतिश्रमाने कोसळलेल्या अण्णांना शांताबाईंनी सावरले होते.
त्या काळात अण्णांनी “माकडीचा माळ”, “बरबाद्या कंजारी”, “चित्रा”, “चंदन”, “वारणेचा वाघ”, “आवडी” यांसारख्या अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या. अण्णांच्या प्रेरणेने शांताबाई स्वतः कम्युनिस्ट चळवळीत उतरल्या. त्यांनी बलराज सहानी, कॉ. रेड्डी, शाहीर अमर शेख, कॉ. गव्हाणकर यांच्यासह तुरुंगवासही भोगला होता.
स्वातंत्र्यानंतर १५ ऑगस्टला अण्णाभाऊंनी आपल्या दोन मुलींना घेऊन गेटवे ऑफ इंडियाची आरास दाखवली होती. तसेच २१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात झालेल्या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या रात्री, अण्णा झोपडपट्टीत बसून “माझी मैना गावावर राहिली” ही रणलावणी लिहीत होते – त्यावेळी शांता आणि शकुंतला या बहिणी त्यांच्या सोबत जाग्या होत्या.
अविवाहित शांताबाई आपल्या बहिणी शकुंतला सपताल यांच्या मुलांकडे – संजय, राजेश आणि प्रशांत – राहत होत्या. या भाच्यांनी त्यांची अखेरपर्यंत मावशीसारखी सेवा केली. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि लिव्हर व किडनीच्या आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हॅशटॅग्स:
#ShantabaiSathe #AnnabhauSathe #LokshahirSathe #CommunistMovement #MarathiNews #BreakingNews #MumbaiNews
फोटो