हातीव येथे माँकड्रील यशस्वी; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सज्जतेचे प्रात्यक्षिक
युद्धजन्य परिस्थितीतील सुरक्षिततेसाठी तालुका प्रशासन, पोलीस व स्थानिक यंत्रणांकडून हातीव, देवरूख परिसरात व्यापक जनजागृती
प्रतिनिधी/ देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील ग्रामपंचायत, शाळा क्र. १ व हातीव मेढे वाणीवाडी येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता तालुका प्रशासनाच्या वतीने युद्धजन्य आपत्तीस्थितीमध्ये नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक (माँकड्रील) यशस्वीरित्या पार पडले.
हे ऑपरेशन केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार करण्यात आले. देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव आणि १८ पोलीस अंमलदारांनी सह्याद्रीनगर, मार्लेश्वर तिठा, देवरूख बसस्थानक परिसरात हवाई हल्ला झाल्यास काय सावधगिरी बाळगावी, सुरक्षित ठिकाणी कसे जावे, याविषयी ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन केले.
हातीव शाळा क्र. १ मध्ये विद्यार्थ्यांवर तसेच हातीव मेढे व वाणीवाडीमध्ये रात्रीच्या वेळी हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा पद्धतीने वागावे याचे वास्तव प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सायरनद्वारे शत्रूचा हल्ला झाल्याची सूचना देण्यात आली आणि त्यानंतर नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाण्याचा सराव करण्यात आला.
या माँकड्रीलमध्ये देवरूख तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगरपंचायत आदी यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासकीय माहितीचा आधार घ्यावा, तसेच आपत्तीच्या वेळी शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
हॅशटॅग्स:
#माँकड्रील #हातीव #संगमेश्वर #आपत्तीव्यवस्थापन #देवरूखपोलीस #RatnagiriNews #EmergencyDrill #CivilDefense