रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती! १२ वर्षांच्या झळाळत्या कारकीर्दीला पूर्णविराम
टी-२० नंतर आता कसोटीलाही रामराम; रोहितच्या अचानक निर्णयाने चाहत्यांमध्ये खळबळ
मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्माने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावरून पोस्ट करत त्याने ही माहिती दिली असून, आपल्या २८० क्रमांकाच्या कसोटी टोपीचा फोटो शेअर करत, “भारतीय संघाचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती,” असं नमूद केलं आहे.
रोहितचा हा निर्णय अचानक जाहीर झाला असून सध्या आयपीएल स्पर्धा सुरु असतानाच त्याने कसोटीमधून माघार घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या संभाव्य मालिकेसाठी निवड होणार की नाही, याची चर्चा सुरू असताना, रोहितने स्पष्ट करून टाकलं की तो आता कसोटी क्रिकेट खेळणार नाही.
रोहित शर्माने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कसोटी पदार्पण केलं. त्याच्या १२ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत त्याने ६७ कसोटीत ४३०२ धावा केल्या. यात १२ शतकं, १८ अर्धशतकं आणि एक द्विशतक सामील असून त्याची सर्वोच्च धावसंख्या २१२ होती. ४०.५८ च्या सरासरीने खेळणाऱ्या रोहितने ८८ षटकार आणि ४७३ चौकार ठोकले.
कर्णधार म्हणूनही रोहितची भूमिका ठळक राहिली. २०२२ ते २०२४ दरम्यान त्याने २४ कसोटींमध्ये भारताचं नेतृत्व केलं, ज्यात १२ सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१–२०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत उपविजेतेपदही पटकावलं.
मात्र, गेल्या काही मालिकांपासून रोहित खराब फॉर्मशी झुंजत होता. विशेषतः शेवटच्या १५ कसोटींमध्ये त्याच्या नावावर केवळ १६४ धावा आहेत. बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली.
टी-२० क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतलेला रोहित आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत असून, एक यशस्वी युग पूर्ण झाल्याची भावना क्रिकेटविश्वात उमटत आहे.
हॅशटॅग्स:
#RohitSharma #TestRetirement #IndianCricket #WTC #TeamIndia #क्रिकेटन्यूज #रोहितशर्मा #कसोटीनिवृत्ती #IPL2025
फोटो