चिपळूण मंडळ अधिकारी राजेशिर्के यांच्यावर कारवाईची मागणी
पत्रकार राधा लवेकर यांचा गंभीर आरोप; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदन
समीर शिरवाडकर….
रत्नागिरी – : चिपळूण तालुक्यातील केतकी खाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर, खुद्द मंडळ अधिकारी राजेशिर्के यांनीच मारहाण घडवून आणल्याचा गंभीर आरोप पत्रकार राधा लवेकर यांनी केला आहे. त्यांनी चिपळूणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मंडळ अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
१३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास पत्रकार राधा लवेकर, स्वाती हडकर आणि बंदरकर या केतकी खाडी परिसरात बेकायदा वाळू उपशाची माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मंडळ अधिकारी राजेशिर्के आणि त्यांची टीमही घटनास्थळी उपस्थित होती. पत्रकार वाळू उपशाची माहिती देत असतानाच वाळूमाफिया दीपक कासेकर, गण्या भालेकर आणि साजिद सरगुरू यांनी राधा लवेकर यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी लवेकर यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून दोन्ही दरवाजांजवळ उभे राहत बाहेर येण्यास मज्जाव केला.
या सर्व प्रकारात मंडळ अधिकारी राजेशिर्के यांची भूमिका संशयास्पद असून, त्यांनीच प्रशासनिक मदत नाकारून पत्रकारांना धक्काबुक्की आणि मनस्ताप होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे राजेशिर्के यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून पत्रकार राधा लवेकर यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
—
#चिपळूण #वाळूउपसा #मंडळअधिकारी #पत्रकारांवरहल्ला #रत्नागिरी #केतकीखाडी #राधालवेकर #DeepakKasekar #राजेशिर्के
फोटो