राष्ट्रहितासाठी आयपीएलला विश्रांती – बीसीसीआयचा निर्णय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२५च्या उर्वरित सामन्यांना तात्पुरती विश्रांती देत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या देशात उद्भवलेल्या संवेदनशील परिस्थितीचे व्यापक मूल्यांकन करून संबंधित अधिकाऱ्यांशी व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. लवकरच स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांची माहिती अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल.
काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेच्या बाबतीत चिंता व्यक्त केल्या होत्या. प्रसारक, प्रायोजक आणि क्रिकेटप्रेमींच्या भावना जाणून घेतल्यानंतर, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करून राष्ट्रहितात हा निर्णय घेतला.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या सशस्त्र दलांनी अलीकडील दहशतवादी हल्ल्यांना आणि पाकिस्तानकडून झालेल्या अनपेक्षित आक्रमणाला जे धैर्यशील आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले आहे, त्यास बीसीसीआयने सलाम केला आहे. त्यांचे शौर्य, निःस्वार्थ सेवा आणि समर्पण हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक ठरत आहे.
“क्रिकेट हा देशातील लाखो नागरिकांच्या भावनांचा भाग आहे, पण राष्ट्राच्या सुरक्षिततेपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही,” असे बीसीसीआयने स्पष्टपणे नमूद केले आहे.
यावेळी बीसीसीआयने प्रमुख भागधारक जिओस्टार (अधिकृत प्रसारक), टाटा (शीर्षक प्रायोजक), तसेच इतर सर्व सहप्रायोजक व हितधारकांचे त्यांच्या समजूतदारपणाबद्दल व राष्ट्रहिताला दिलेल्या प्राधान्याबद्दल आभार मानले आहेत.
बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, “आम्ही देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राष्ट्रासाठी आवश्यक असलेल्या निर्णयांशी बीसीसीआयची मूल्ये नेहमीच संरेखित राहतील.”