गुहागरच्या डॉ.बाळासाहेब लबडे यांना स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय पुरस्कार घोषित
आबलोली (संदेश कदम)
स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने “स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी” पुरस्कारासाठी सन २०२४साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून या पुरस्कारासाठी उत्तम प्रतिसादही लाभला. ४२ कवितासंग्रह आणि १० कादंबऱ्या प्राप्त झाल्या होत्या.पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. उत्तम आणि नाविन्यपूर्ण दर्जेदार कलाकृतींची नि:पक्षपणे निवड करून कवी आणि कादंबरीकार यांचा सन्मान व्हावा आणि मराठी साहित्य क्षेत्रात अभिरुची संपन्न साहित्य कलाकृतीस प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी २०२४साठी कवितेचा राज्यस्तरीय पुरस्कार वाशिमचे कवी महेंद्र ताजणे यांच्या “खूप काही आणखी” या काॅपर काॅईन पब्लिशिंग प्रा. लि. दिल्ली प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहास आणि कादंबरीचा राज्यस्तरीय पुरस्कार डाॅ. बाळासाहेब लबडे, गुहागर, जि. रत्नागिरी यांच्या “चिंबोरेयुद्ध “या अथर्व पब्लिकेशन्स जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या कादंबरीसाठी घोषित करण्यात आलेला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप दोन्ही कलाकृतींना रू. पाच हजार, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे असून लेखकाच्या गावी त्या जिल्ह्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते कौटुंबिक स्वरूपात कवी/कादंबरीकार यांचे निवासस्थानी करण्यात येणार आहे.
असाच सन्मान गेल्या वर्षी झाल्याने कवी/कादंबरीकार यांचे कुटुंबीय आनंदीत झालेले होते. अशा पुरस्कार प्रदानाचे स्वागतही साहित्यक्षेत्रात झाले होते.
या पुरस्काराचे संयोजक शशिकांत हिंगोणेकर आणि उषा हिंगोणेकर
यांनी आज निकाल घोषित करून पुरस्कार प्राप्तकर्त्यांना सुखद धक्काही दिला. कवी महेंद्र ताजणे आणि कादंबरीकार डॉ. प्रा. बाळासाहेब लबडे यांचे नव्या लेखनासाठी अभिनंदन आणि शुभेच्छापर पत्रही संयोजकांनी पाठवले आहे.
——————————————-
शशिकांत हिंगोणेकर
संयोजक
स्मृती शेष चमेलीभाऊराव
राज्यस्तरीय
काव्य-कादंबरी पुरस्कार,
जळगाव ४२५००१
मो.नं. ७२१८७९२१६