बिनपरवाना पद्धतीने गटारातून पाईपलाईन टाकण्याचा प्रकार; शौकत मुकादम यांचा जोरदार आक्षेप
कळंबस्ते-आंबडस रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे काम वादाच्या भोवऱ्यात; गटारातच पाईपलाईन टाकल्याने पावसाळ्यात निचऱ्याचा प्रश्न गंभीर
तळवली (मंगेश जाधव) – कळंबस्ते-आंबडस रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता थेट गटारातूनच पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हे काम सुरू असून, संबंधित ठेकेदाराने गटारातच पाईपलाईन टाकल्यामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्री. शौकत मुकादम यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, गटाराच्या कामांदरम्यान पाईपलाईन वारंवार फुटण्याची शक्यता असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी श्री. नाईक यांच्याशी संपर्क साधत कामाची पाहणी करून ठेकेदारास सूचित करण्याची मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मुकादम संतप्त झाले.
उल्लेखनीय म्हणजे, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. पावसाळ्यापूर्वी गटारांची सफाई व देखभाल पीडब्ल्यूडीकडून केली जाते. अशावेळी त्याच गटारात पाईपलाईन टाकल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदार दोन ते तीन फूट गटार खोल करून पाईपलाईन टाकत असल्याने भविष्यात ती धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे.
ही पाईपलाईन गटाराच्या बाहेरून खोलवर टाकावी, अशी स्पष्ट मागणी श्री. शौकत मुकादम यांनी केली आहे.
हॅशटॅग्स:
#चिपळूण #पाण्याचीपाईपलाईन #गटारकाम #शौकतमुकादम #महाराष्ट्रजीवनप्राधिकरण #PWD #RatnagiriNews #InfrastructureIssue
फोटो