लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट; ॲक्विला ऑरगॅनिकमध्ये दोन कामगार भाजले
आगीच्या घटनांमध्ये वाढ; कारखान्यांच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांचा संताप
खेड (वार्ताहर) तालुक्यातील लोटे एमआयडीसी पुन्हा एकदा भीषण दुर्घटनेने हादरली. रविवारी (दि. १८ मे) दुपारी ॲक्विला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या औद्योगिक आस्थापनातील रिऍक्टरचा स्फोट होऊन दोन कामगार गंभीर भाजले. याच दिवशी लासा सुपरजीनेरिक या दुसऱ्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीनेही संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
स्फोट झाल्याच्या वेळी औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन बंब लासा कंपनीतील आग विझवण्यात व्यस्त होते. त्याचदरम्यान महामार्गाच्या पश्चिमेकडील ॲक्विला कंपनीत स्फोट झाला. या दुर्घटनेत भाजलेल्या कामगारांना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी दुचाकीवरून रुग्णालयात हलवण्यात आले. कारखान्यात रुग्णवाहिका नसणे आणि व्यवस्थापनाने चारचाकी गाडीचीही व्यवस्था न करणे, ही निष्काळजीपणाची कमाल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोटे एमआयडीसीमध्ये प्रदूषण, वायूगळती, सांडपाणी उघड्यावर सोडणे आणि अशा दुर्घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थापनावर कोणीच नियंत्रण ठेवत नाही का, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
—
#लोटेएमआयडीसी #स्फोट #औद्योगिकदुर्घटना #कामगार #ॲक्विलाऑरगॅनिक #खेड #रत्नागिरी #औद्योगिकबेफिकिरी #सुरक्षा
फोटो