नवी मुंबईत रंगणार साहित्यिक सोहळा!
‘२रे एकदिवसीय रंगधनु नवरंग साहित्य संमेलन २०२५’ – ८ जून रोजी कोपरखैरणे येथे
नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला आणि संस्कृतीच्या त्रिवेणी संगमातून सजणार आहे नवी मुंबई! नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘२रे एकदिवसीय रंगधनु नवरंग साहित्य संमेलन २०२५’ हा बहुप्रतिक्षित साहित्यिक सोहळा रविवार, ८ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता, कोपरखैरणे येथील ‘ज्ञानविकास शिक्षण संकुल सभागृहात’ रंगणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ साहित्यिक श्री. एल. बी. पाटील यांच्याकडे असून, स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सामाजिक नेते श्री. पी. सी. पाटील उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभाने होणार आहे.
पहिल्या सत्रात, नवरंगचे अध्यक्ष गज आनन म्हात्रे लिखित ‘नवी मुंबईच्या प्राचीन ग्रामदेवता’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या ग्रंथाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे हा रंगहीन सोहळा ठरणार आहे.
यानंतर, नवी मुंबईतील सहा गुणी कलाकारांना ‘नवरंग कलारत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, कला, लोकसंस्कृती आणि समाजकार्य क्षेत्रातील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांची नावे संमेलनस्थळी जाहीर केली जातील.
दुसऱ्या सत्रात, ‘आजचे पुस्तक – दिशा आणि दशा’ या विषयावर सखोल परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. देविदास पोटे हे असतील. या चर्चासत्रात नामवंत लेखक, समीक्षक आणि वाचक सहभागी होणार आहेत.
तिसऱ्या आणि अंतिम सत्रात, प्रसिद्ध साहित्यिका प्रतिभा सराफ यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कवीसंमेलनाचे आयोजन होणार आहे. विविध काव्यप्रकारांचा आस्वाद घ्यायची ही एक पर्वणी ठरणार आहे. नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, पुणे येथील अनेक नवोदित आणि ज्येष्ठ कवी यात सहभागी होणार आहेत.
संमेलनाचे संयोजक गज आनन म्हात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली असून, अधिक माहितीसाठी 9323172614 ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
साहित्यप्रेमींनी या बहारदार सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहून साहित्यिक आनंदाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.