लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; हैदराबादचा हंगामातील चौथा विजय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; हैदराबादचा हंगामातील चौथा विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले. अशाप्रकारे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला पाचवा संघ बनला. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत सात गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबादने १८.२ षटकांत चार गडी गमावून २०६ धावा केल्या आणि सामना जिंकला. त्यांच्याकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ५९ धावा केल्या. लखनौकडून दिग्वेश राठीने दोन तर विल्यम ओ’रोर्क आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने या सामन्यात धक्कादायक सुरुवात केली. अथर्व तायडे १३ धावा करून बाद झाला. यानंतर, अभिषेक शर्माने इशान किशनसह डावाची जबाबदारी घेतली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ८२ धावांची भागीदारी झाली. २० चेंडूत ५९ धावा करून अभिषेक बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने दिग्वेश राठीकरवी झेलबाद केले.
यानंतर इशान किशनला हेनरिक क्लासेनची साथ मिळाली. दोघांनीही काही चांगले फटके मारले आणि ४१ धावा जोडल्या. किशन २८ चेंडूत ३५ धावा काढून बाद झाला तर क्लासेन ४७ धावा काढून तंबूमध्ये परतला. दरम्यान, कामिंदू मेंडिस ३२ धावा काढून रिटायर्ड हर्ट झाला. तो हॅमस्ट्रिंगशी झुंजत असल्याचे दिसून आले. अनिकेत वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी प्रत्येकी पाच धावांवर नाबाद राहिले.
त्याआधी, मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांनी स्फोटक फलंदाजी करून लखनौला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ११५ धावांची भागीदारी झाली जी हर्ष दुबेने मोडली. त्याने मार्शला आपला बळी बनवले, जो ३९ चेंडूत ६५ धावा करून तंबूमध्ये परतला. दरम्यान, हर्षल पटेलने मार्करामला त्रिफळाचीत केले. तो ३८ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. लखनौकडून निकोलस पूरनने ४५ धावा केल्या तर कर्णधार ऋषभ पंतची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. त्याने फक्त सात धावा केल्या. आयुष बदोनी तीन, अब्दुल समद तीन आणि शार्दुल ठाकूर चार धावा करून बाद झाले. तर, आकाश दीप सहा धावांवर नाबाद राहिला आणि रवी बिश्नोई खाते न उघडता नाबाद राहिला. हैदराबादकडून इशान मलिंगाने दोन तर हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Gurudatta Wakdekar
Author: Gurudatta Wakdekar

???? गुरुदत्त दिनकर वाकदेकर- मुंबई ???? ???? ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक - महाराष्ट्र मधील विवीध वृत्तपत्रातून लेखन आणि पत्रकारिता

Leave a Comment

आणखी वाचा...