मुंबई-गोवा हायवेलगत बेवारशी गटारे पावसात जीव घेऊ शकतात; शौकत मुकादम यांची तातडीने उपाययोजनेची मागणी
हायवेच्या गटाऱ्यांची दुर्दशा: अपघातांना आमंत्रण!
बातमी … मंगेश जाधव.
नवी मुंबई – मुंबई-गोवा हायवे लगतच्या रस्त्यांवर बांधण्यात आलेली सिमेंट काँक्रिटची गटारे सध्या नागरिकांच्या जीवितास धोका ठरत आहेत. या गटाऱ्यांची रचना अयोग्य असून, रस्ता खाली आणि गटारे वर उंचीवर असल्यामुळे पावसाचे पाणी गटारात न जाता रस्त्यावर साचते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठी असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.
बहादुरशेख नाका ते पाग नाका हा परिसर नगरपरिषदेच्या हद्दीत असून, या हद्दीत हायवे प्राधिकरणाने निकृष्ट दर्जाची गटारे बांधली आहेत. ती आतून कोसळून गटाराचा भरावच गटारात जमा झाल्याचे निरीक्षण आहे. या गटाऱ्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई कोण करणार? नगरपरिषद की हायवे विभाग? या जबाबदारीवर सध्या कोणतेही खातं पुढे येत नसल्याची टीका मुकादम यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, काही ठिकाणी गटारे उघडण्यासाठी आर.सी.सी. कप्पे ठेवले असून त्यांना लोखंडी हुक बसवले आहेत. या हुकांमध्ये पाय अडकून अपघात होतात. ही रचना चुकीची असून, कप्पे उचलण्यासाठी आतून खाच असणे गरजेचे आहे.
याशिवाय, ही गटारे कचऱ्याने तुडुंब भरली असल्याने नैसर्गिक पाणीवाहतूक पूर्णतः थांबली आहे. हीच परिस्थिती परशुराम ते असुर्डे दरम्यानच्या हद्दीतही दिसून येत आहे.
“गटारे कोणाच्या अखत्यारीत आहेत, हे स्पष्ट करून तातडीने सफाई आणि दुरुस्तीस सुरुवात करावी,” अशी ठाम मागणी शौकत मुकादम यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा, पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असेल, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
—
हॅशटॅग्स:
#मुंबईगोवाहायवे #गटारसफाई #नवीमुंबईसमस्या #शौकतमुकादम #नगरपरिषद #पावसाळीधोका #HighwaySafety #RatnagiriVartahar
—
फोटो