अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प; राज्यभरात संतापाची लाट
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा सुरुंग; विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वेळ वाया, पालक संतप्त
नवी मुंबई (मंगेश जाधव) —
राज्यात यंदा प्रथमच संपूर्ण अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प झाल्याने हजारो विद्यार्थी व पालक अडचणीत सापडले आहेत. बुधवारी सकाळपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, अधिकृत संकेतस्थळ सतत बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटू लागला.
सकाळी “502 Bad Gateway” हा त्रुटी संदेश झळकू लागला आणि नंतर “संकेतस्थळाचे काम सुरू आहे” अशी सूचना दाखवली जात होती. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्याच्या तयारीत असलेले विद्यार्थी सायबर कॅफे व संगणकांसमोर ताटकळत बसून राहिले. परिणामी, प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
यंदा राज्यभरातून 13.02 लाख विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्यासाठी 20.91 लाख जागा उपलब्ध आहेत. याआधी ही प्रणाली फक्त महानगरांपुरती मर्यादित होती. मात्र यंदा शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यात ती राबवण्याचा निर्णय घेतला. तज्ज्ञांनी यापूर्वीच यावर चिंता व्यक्त केली होती, ती आता खरी ठरत आहे.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असला, तरी त्यावरही प्रतिसाद मिळत नसल्याचे पालकांनी सांगितले. अनेकांनी सतत संपर्काचा प्रयत्न केला, पण उत्तर मिळाले नाही.
शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळ सुधारण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी, विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. या गोंधळामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि पालकांमध्ये नाराजी वाढली आहे. तांत्रिक अडचणी वेळेत न सुटल्यास, प्रवेश प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हॅशटॅग्स:
#अकरावीप्रवेश #तांत्रिकगोंधळ #विद्यार्थीअडचणीत #ऑनलाईनप्रवेश #शिक्षणविभाग #मराठीबातमी #RatnagiriVartahar
फोटो