राज्यभर गाजलेल्या वैष्णवी मृत्यू प्रकरणात अखेर सासऱ्यासह दीर अटकेत!
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सात दिवसांच्या फरारीनंतर बावधन पोलिसांच्या तावडीत; महिला आयोगाचा ठाम पाठपुरावा
नवी मुंबई (मंगेश जाधव ) – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर फरार असलेले सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या दोघांना आज (२३ मे) पहाटे ४.३० वाजता बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं. या अटकेमुळे राज्यभर गाजलेलं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आधीच पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती. फरार असलेले सासरे आणि दीर पोलिसांच्या रडारवर होते. त्यांच्या शोधासाठी चार पथके कामाला लागली होती आणि अखेर आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात राज्य महिला आयोगाने पहिल्याच दिवशी सुमोटो घेत चौकशी सुरू केली होती. “गुन्हा गंभीर असून आरोपींवर कठोर कारवाई होईल, यासाठी महिला आयोग सतत पाठपुरावा करत आहे,” अशी माहिती अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यासाठी तिच्या माहेरच्यांनी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या घरी जाऊन प्रयत्न केला असता त्याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून घराबाहेर काढले. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात निलेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तो वैष्णवीच्या नवऱ्याचा मित्र असून बाळाला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत, लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी व चांदीची भांडी दिल्यानंतरही तिला सासरी सतत त्रास दिला जात होता. पोस्टमार्टम अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळल्याची माहितीही समोर आली आहे.
—
#वैष्णवीहगवणे #AtrocityOnWomen #DomesticViolence #RajendraHagwane #SushilHagwane #RupaliChakankar #StateWomenCommission #JusticeForVaishnavi #RatnagiriVartahar
फोटो