राज्यभरातील केळी शेतकऱ्यांसाठी माढ्यात ‘तिसरी राज्यस्तरीय केळी परिषद’
२७ मे रोजी माढा येथे परिषद; हमीभाव, पिकविमा, पोषण आहारातील समावेश आदी मुद्द्यांवर चर्चा
अहिल्यानगर प्रतिनिधि नंदकुमार बागडेपाटील.
महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य’ यांच्यातर्फे तिसरी राज्यस्तरीय केळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद मंगळवार, दिनांक २७ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जगदाळे मंगल कार्यालय, वैराग रोड, माढा, जिल्हा सोलापूर येथे पार पडणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. किरणभाऊ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सद्यस्थितीत केळी पिकाच्या उत्पादनात वाढ झाली असली, तरी हमीभावाचा अभाव, खत व्यवस्थापनातील अडचणी, पिकविमा न मिळणे, तसेच शालेय पोषण आहारात केळीचा अभाव या अनेक प्रश्नांनी शेतकरी त्रस्त आहेत. यावर विचारमंथन करून ठोस उपाययोजना मांडण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेला मार्गदर्शक म्हणून संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटक म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजीत आबा पाटील, आमदार नारायण आबा पाटील, दादासाहेब साटे व जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अतुलनाना माने पाटील भूषवतील.
यावेळी विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. योगेश महसे हे ‘केळी उत्पादनातील खत व्यवस्थापन’, मनोहर पाटील (नमो बायो प्लॅन्ट, महाराष्ट्र हेड) ‘खत व्यवस्थापन’, तर डॉ. विद्या मनोहर सोनवणे ‘केळी व आरोग्य’ या विषयांवर सखोल माहिती देतील.
संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांनी सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या परिषदेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेस अतुलनाना माने पाटील, डॉ. हनुमंत चिकणे, किशोर चौधरी, छगन गुजर, उत्तम पाटील, राजेश नवाल, पंढरीनाथ इंगळे, सचिन कोरडे, महेंद्र पाटील, वैभव पोळ, पुरुषोत्तम सजे, धीरज पाटील, ओंकार पवार, केशव गायकवाड, रत्नाकर पाटील यांची उपस्थिती होती.
हॅशटॅग्स:
#केळीपरिषद #BananaFarmers #KeliParishad2025 #SolapurEvents #MaharashtraAgriculture #KiranChavan #KeliSheti #माढा
फोटो