अखेर पाऊस आला!१२ दिवस आधीच मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश!
तळकोकणात मान्सूनचं आगमन; शेतकरी सुखावले, मुंबई-पुण्याला येत्या तासांत पावसाचा अंदाज
रत्नागिरी वार्ताहर | २५ मे २०२५
मान्सूनचं अखेर महाराष्ट्रात वेळेआधीच दमदार आगमन झालं आहे. काल केरळात दाखल झालेला मान्सून गोव्याच्या मार्गे आज थेट तळकोकणात दाखल झाला असून नेहमीच्या वेळेपेक्षा तब्बल १२ दिवस आधीच त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
दरवर्षी सुमारे ७ जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात पोहोचतो. मात्र, यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच तो राज्यात दाखल झाला. गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून काही रस्त्यांवर पाणी साचलं आहे. म्हापसा येथे बाजारपेठांतही पावसाचे पाणी घुसलं आहे.
मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्यानुसार, लवकरच मान्सून मुंबई आणि पुण्यातही दाखल होण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई व ठाण्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे.
तळकोकणात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. परिणामी, वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. मान्सूनच्या वेळेपूर्वी आगमनामुळे राज्यातील खरिप हंगामाच्या तयारीला गती मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
—
#मान्सून2025 #महाराष्ट्रपावसाळा #मान्सूनआगमन #तळकोकणपाऊस #शेतकरीआनंदात #MumbaiRainAlert #RatnagiriNews #रत्नागिरीवार्ताहर
फोटो