कोकणात शेती भाजवण वाहून गेली; शेतकऱ्यांना प्रति गुंठा ६ हजार भरपाई द्यावी – बळीराज सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अतिवृष्टीमुळे पेरणीपूर्व तयारी उद्ध्वस्त; बळीराज सेनेच्या पराग कांबळे यांनी गुहागर तालुक्यातून निवेदनाद्वारे मांडली मागणी
बातमी .
आबलोली (संदेश कदम) – कोकणासह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी केलेली भाजवण अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रति गुंठा ६ ते ७ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी सरकारकडे केली आहे.
गुहागर तालुक्यातील बळीराज सेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात या मागणीचा समावेश आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, तालुकाध्यक्ष अरुण भूवड, तसेच तालुका सचिव ॲड. दिनेश कदम यांच्या सह्या आहेत.
कोकणातील शेतकरी पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करून भाजवणी करतात. यासाठी त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. मात्र, रोहिणी नक्षत्रातील पेरणीच्या आधीच आलेल्या अतिवृष्टीमुळे भाजवलेली शेती वाहून गेली आहे. त्यामुळे कोकणातील बळीराज हवालदिल झाला आहे.
सरकारने सरासरी पाहणी करून पंचनामे करावेत आणि प्रतिगुंठा ६ हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी आग्रही मागणी बळीराज सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
हॅशटॅग्स:
#कोकणशेती #भाजवणनुकसान #बळीराजसेना #रत्नागिरी #गुहागर #शेतकऱ्यांचीमागणी #मुख्यमंत्र्यांकडेनिवेदन #कृषिहानी #कोकणातपाऊस
फोटो