???? सांगलीत उपायुक्त लाच प्रकरणी अडकले; कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष!
२४ मजली इमारतीच्या परवान्यासाठी ७ लाखांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची थेट कारवाई; इस्लामपूर, साताऱ्यातही छापे
सांगली – २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाख रुपये लाच मागणाऱ्या सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव विजय साबळे (वय ३१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली युनिटने सोमवारी (९ जून) रंगेहाथ पकडले. महापालिकेत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली असून, इस्लामपूर व सांगलीत जल्लोष करण्यात आला.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, २४ मजली इमारतीच्या परवान्यासाठी साबळे यांनी १० लाखांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ७ लाख रुपयांवर सौदा ठरला. १७ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला पडताळणी झाली. अखेर सोमवारी साबळे यांना पालिकेच्या मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्या सांगलीतील घराची झडती घेण्यात आली. साताऱ्यातील त्यांच्या मूळ घरीही छापे टाकण्यात आले असून, काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
कारवाईचा नवा चेहरा – उपअधीक्षक अनिल कटके
या कारवाईचं नेतृत्व नुकतेच पदभार स्वीकारलेले उपअधीक्षक अनिल कटके यांनी केलं. या तपासात तत्कालीन उपअधीक्षक उमेश पाटील यांनी तक्रारीची मूळ पडताळणी केली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव मात्र निर्दोष
तक्रारीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याचंही नाव देण्यात आलं होतं. मात्र त्याची पडताळणी केल्यानंतर कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही, असं अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलं आहे.
इस्लामपूरमध्ये फटाक्यांचा जल्लोष!
वैभव साबळे हे इस्लामपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी होते. कारवाईनंतर त्यांच्या विरोधातील संताप व्यक्त करत पालिकेच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
—
???? फोटो