पाटपन्हाळे विद्यालयात शाहू महाराज जयंती व कवी कालिदास दिन साजरा
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व कवी कालिदास दिन कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण यांच्या अध्यक्षतेत नुकताच साजरा करण्यात आला.
पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व कवी कालिदास दिनानिमित्त दिपप्रज्वलन शिक्षकवृंदांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज व कवी कालिदास यांच्या प्रतिमांचे पूजन मुख्याध्यापिका चव्हाण व प्रा.एस.एस.मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण , जेष्ठ प्रा.एस.एस.मोरे , सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे , शिक्षक एस.बी.मेटकरी , एस.एम.आंबेकर , सौ.एन.पी.वैद्य आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका तसेच उपस्थित शिक्षकवृंद यांचे माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी मानसी संदीप पालकर हिने व प्रास्ताविक इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी मृण्मयी दत्ताराम जाधव हिने केले.
इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी अभिज्ञा दिनेश पवार , इयत्ता नववीमधील शमिका भिडे , इयत्ता दहावीमधील सई बारे , अनुश्री केतकर, मन्विता जोयशी या विद्यार्थिनींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज व कवी कालिदास यांच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे यांनी कवी कालिदास यांचे कार्य , संस्कृत विषयासाठी लाभलेले योगदान आदी मुद्यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ शिक्षक एस.बी.मेटकरी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन कार्य , समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराजांचे लाभलेले योगदान , शैक्षणिक व सामाजिक कार्य आदी मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन कार्य , समता व बंधुता या जीवन मूल्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांचे योगदान आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन करून सदरच्या कार्यक्रमात वकृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचे व कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. इयत्ता दहावीमधील विद्यार्थीनी समृद्धी सुरेश आंबेकर हिने वकृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थिनी , मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.