मनसेचा मीरा-भाईंदर मोर्चा वादाच्या भोवऱ्यात: अविनाश जाधव पहाटेच ताब्यात
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसे ठाम; पहाटेच्या कारवाईने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
मंगेश जाधव ~ नवी मुंबई
मीरा-भाईंदर: अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज मीरा-भाईंदर शहरात आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली असून, मंगळवारी पहाटे साडेतीन वाजताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आजच्या मोर्चावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
पोलिसांनी सोमवारपासूनच मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. अविनाश जाधव यांनाही नोटीस मिळाली होती, तरीही ते मोर्चासाठी ठाम होते आणि त्यांनी मराठी बांधवांना मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. यामुळे, पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौजफाट्यासह अविनाश जाधव यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर पोलिसांनी वसई आणि विरारमधील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही धरपकड सुरू केली आहे. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होऊन मिरा रोड स्टेशन परिसरात सांगता होणारा हा मोर्चा आता अविनाश जाधव यांच्या अटकेमुळे अडचणीत आला आहे.
#मनसेमोर्चा #अविनाशजाधव #मीराभाईंदर #महाराष्ट्रपोलिस #राजकारण #मनसे