मिरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंची ‘राजगर्जना’: मराठी एकजुटीचे दर्शन!
भाईंदर: मराठीच्या मुद्द्यावरून निघालेल्या भव्य मोर्चानंतर शुक्रवारी मिरा भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी भाषिकांची एकजूट दिसून आली. यावेळी मनसैनिक आणि शिवसैनिक या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
सध्या राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वातावरण तापले असून, मनसेने याविरोधात ठाम भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला ठोस निर्णय घेणे कठीण झाले आहे. राज ठाकरे हे मराठीच्या याच मुद्द्यावर जनसामान्यांमध्ये जात आहेत. काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला होता, ज्याला मराठी भाषिक नागरिकांनी एकत्र येऊन चोख प्रत्युत्तर दिले होते. या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर मराठी भाषिक लोकांचे आभार मानण्यासाठी राज ठाकरे यांनी ही जाहीर सभा आयोजित केली होती.
गेल्या १८ वर्षांनंतर राज ठाकरे शहरात जाहीर सभा घेत असल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पक्ष कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी केली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अंधेरीपासून ते मीरा रोड येथील सभेच्या ठिकाणापर्यंत जाहिरात फलक लावण्यात आले होते. सायंकाळी चार वाजल्यापासून सभेच्या ठिकाणी नागरिकांनी जमायला सुरुवात केली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सभास्थळी प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र होते. ‘मराठी जयघोष’ आणि ‘राज ठाकरे’ यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
सभेच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बालाजी चौकापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते.
मिठाई विक्रेत्याचे दुकान बंद
यापूर्वी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मीरा रोड येथील ‘जोधपूर’ नामक मिठाई विक्रेत्याला मनसैनिकांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांनी मराठी भाषिक नागरिकांचा विरोध करण्यासाठी मोर्चा काढला होता, ज्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांनी मोठे आंदोलन केले होते आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, शुक्रवारी राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये आले असता, मनसे कार्यकर्त्यांनी याच दुकानाबाहेरील चौकात त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी कोणताही वाद होऊ नये म्हणून मिठाई विक्रेत्याने आपले दुकान बंद ठेवल्याचे दिसून आले.
#RajThackeray #MNS #MiraBhayandar #MarathiUnity #MarathiBhasha #MaharashtraPolitics #Rajgarjana #MarathiSwabhiman #मनसे #राजठाकरे #मीराभाईंदर #मरा
ठीएकजूट