अभंग गायनातून साकारली पंढरी – संतविचारांचा आणि विद्यार्थिनींच्या भक्तीचा महोत्सव”
प्राचार्य डॉ. अर्चना पत्की : “संतांचे अभंग आजही आपल्याला मानसिक आधार देऊन योग्य मार्ग दाखवितात”
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!”
संतांचे आगमन हे नेहमीच आनंद, मंगल आणि भक्तिभावाचे प्रतीक असते. सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी कामिका एकादशीच्या निमित्ताने श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय आणि श्री एम. पी. शाह कनिष्ठ महाविद्यालयात अशाच एक भक्तिपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळाला, जणू साक्षात विठ्ठलमाऊलीच भक्तगणांना दर्शन देण्यासाठी अवतरले.
या दिवशी महाविद्यालयातील मराठी वाड्मय मंडळाच्या वतीने आयोजित “अभंग गायन स्पर्धा २०२५” मध्ये एकूण ७१ विद्यार्थिनींनी उस्फूर्त सहभाग नोंदवून संतवाङ्मयाचा गोडवा आणि अभंगांची भक्तिरसाळ परंपरा रसिकांसमोर उलगडली.
“ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला, नामदेवांनी भक्तीचा गंध दरवळवला आणि तुकारामांनी भावनांचा महासागर उलगडला. आजच्या विद्यार्थिनी त्यांच्या अभंगांनी हेच तेज पुढे नेत आहेत,” असे विचार प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील संत परंपरा ही आपल्या सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कृतीची शिदोरी आहे. संतांचे अभंग आजही आपल्याला मानसिक आधार देतात आणि जीवनवाट दाखवतात. मराठी विभागाच्या या उपक्रमातून विद्यार्थिनींना संतविचारांची खरी ओळख होते, हे विशेष कौतुकास्पद आहे.”
उपप्राचार्य प्रा. अल्पा दोशी यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले, “आजच्या तरुण पिढीला भारतीय मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. विद्यार्थिनी अभंग गायनातून संतांचे विचार प्रभावीपणे सादर करत आहेत, ही काळाची गरज आहे.”
कला शाखेच्या प्रमुख डॉ. हिना शाह यांनी विद्यार्थिनींच्या पारंपरिक वेषातील सादरीकरणाचे विशेष कौतुक करत सांगितले, “विद्यार्थिनींनी केवळ गाणं सादर केलं नाही, तर त्यांच्या पोशाखातून, हावभावातून आणि भक्तिरसातून संपूर्ण महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवलं.”
या स्पर्धेत कला, वाणिज्य आणि बॅफ शाखेतील विद्यार्थिनींचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. विजयी विद्यार्थिनींचा प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. किरण जाधव (समाजशास्त्र विभाग) आणि प्रा. रिता खडगी (पर्यावरण शिक्षण विभाग) यांनी परखडपणे केले. अभंगांची निवड, सूर, लय, भावभावना आणि प्रस्तुती यांचा समग्र विचार करून गुणांकन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे रसाळ आणि सुसंवादी सूत्रसंचालन प्रा. नेहा भोसले (मराठी विभाग प्रमुख) आणि डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप पाटील यांनी अत्यंत मन:पूर्वक केले.
कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संतांच्या अभंगगायनातून पंढरपूरची ओढ, विठ्ठलमाऊलीचं स्मरण आणि भक्तिभावाने ओतप्रोत वातावरण यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. ही स्पर्धा नव्हतीच – हा भक्तिरसात न्हालेला, संतविचारांनी भारलेला आणि विद्यार्थिनींच्या अभंगगायनाने पावन झालेला एक सुसंस्कृत सोहळा होता!