फडणवीसांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव: ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकामुळे राजकीय भुवया उंचावल्या!
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक
रत्नागिरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी फडणवीसांवर स्तुतिसुमने उधळल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात फडणवीसांनी ठाकरेंना दिलेली ऑफर असो, किंवा आदित्य-फडणवीस यांची झालेली भेट असो, या पार्श्वभूमीवर हे कौतुक विशेष लक्षवेधी ठरले आहे.
शरद पवारांचे फडणवीसांच्या कामाचे कौतुक:
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती आणि कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, असा प्रश्न पडत असल्याचे म्हटले आहे. पवार पुढे म्हणाले, “देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट आहे. ते आधुनिकतेची कास धरणारे नेते आहेत. देवेंद्र यांनी आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यांच्या कामाचा उरक आणि झपाटा पाहून मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तो कार्यकाळ आठवतो.” फडणवीसांच्या कामाची गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत टिकून राहो आणि कालचक्र क्रमाने वृद्धिंगत होवो, असे अभिष्टचिंतन शरद पवारांनी वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरेंकडून ‘प्रामाणिक’ आणि ‘हुशार’ राजकारणीचे प्रमाणपत्र:
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘हुशार आणि प्रामाणिक राजकारणी’ असे संबोधले आहे. भविष्यात देवेंद्र यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकाविषयी:
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकात ठाकरे-पवारांनी गौरवोद्गार काढल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. या पुस्तकात अजित पवार, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, नितीन गडकरी यांचेही लेख समाविष्ट आहेत.
#DevendraFadnavis #MaharashtraNayak #SharadPawar #UddhavThackeray #MaharashtraPolitics #CoffeeTableBook #PoliticalBuzz #BirthdayWishes #भाजप #राष्ट्रवादीकाँग्रेसशरदचंद्रपवार #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #राजकारण #पु
स्तकविमोचन