लांजा-साटवली रस्त्याची दुरवस्था: कोंडये सरपंच आक्रमक, १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लांजा-साटवली रस्त्याची दुरवस्था: कोंडये सरपंच आक्रमक, १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा

लांजा (प्रतिनिधी: जितेंद्र चव्हाण): लांजा तालुक्यातील लांजा-साटवली रस्त्यावरील कोंडये गावातून साटवलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गटार लाईन नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कोंडये ग्रामपंचायतचे सरपंच मनोज चंदुरकर यांनी या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी लांजा सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन लांजा-साटवली-इसवली रस्ता रा.मा.क्र.१६८ च्या दुरवस्थेबाबत माहिती दिली होती. कोंडये ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटार अपूर्ण असल्याने आणि साईट व गटारांवर अतिक्रमण झाल्यामुळे होणाऱ्या अपघातांतून मुक्ती मिळावी, अशी मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली होती.

मात्र, या निवेदनानंतरही लांजा सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. यामुळे संतप्त झालेल्या सरपंच मनोज चंदुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने या रस्त्यावरील साईट पट्टी दुरुस्त करण्याची आणि पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी केली आहे.

यासोबतच, कोंडये येथे असलेले गतिरोधक स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्यावर कलर पट्टा मारण्यात यावा आणि ते व्यवस्थित दिसतील यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही चंदुरकर यांनी केली आहे.

जर सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर येत्या १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा सरपंच मनोज चंदुरकर यांनी दिला आहे. कोंडये गावात गटार लाईन्स नसल्याने रस्त्यावर पाणी साचून चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. सरपंच चंदुरकर यांनी खड्डे, साईट पट्टीचा अभाव आणि गतिरोधकांवर कलर पट्ट्या नसलेल्या स्थितीची छायाचित्रे सादर केली आहेत.

 

#LanjaSatavliRoad #KondyeVillage #RoadSafety #PublicWorksDepartment #RatnagiriNews #लांजासाटवलीरस्ता #रस्त्याचीदुरवस्था #सार्वजनिकबांधकामविभाग #मनोजचंदुरकर #उपोषण

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...