धोपेश्वर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा!
राजापूर (प्रतिनिधी: पुरुषोत्तम खांबल): राजापूर तालुक्यातील धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप दीपक रत्नाकर गुरव यांनी केला आहे. ग्रामस्थांच्या अनेक पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत, तसेच तोंडी आणि लेखी निवेदने देऊनही जाणीवपूर्वक अर्जदारांना डावलले जात असल्याचा दावा गुरव यांनी केला आहे.
दीपक गुरव यांच्या म्हणण्यानुसार, धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्ये सध्या राजकारण सुरू आहे. येथील सरपंच आणि ग्रामसेवकाची नागरिकांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याची मनस्थिती नाही. या सर्व बाबींना कंटाळून त्यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत विरोधात उपोषण करण्याचा थेट इशारा दिला आहे. या उपोषणाद्वारे लोकांना येथील भ्रष्टाचाराची माहिती मिळेल, असेही गुरव यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही दीपक गुरव यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून आणि ग्रामसभेत विषय मांडूनही त्यांच्या विषयांना टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या या कारभाराविरोधात त्यांनी आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे.
#DhopeshwarGramPanchayat #CorruptionAllegations #DeepakGurav #RajapurNews #GramPanchayatCorruption #Uposhan #राजापूर #धोपेश्वरग्रामपंचायत #भ्रष्टाचार #दीपकगुरव