ग्रामपंचायतीचे ‘कारभारी’ बदलल्याने जुने ठराव रद्द करता येणार नाहीत.
सरपंचाची मनमानी थांबणार
गुहागर/ प्रतिनिधी : ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या कारभाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कारभारी आले म्हणून आधीच्या ग्रामपंचायत बैठकीत घेतलेले ठराव किंवा निर्णय रद्द करता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच दिला आहे. अशा पद्धतीला परवानगी दिल्यास ग्रामपंचायतींचे कामकाज अराजकतेकडे जाईल आणि पंचायती राज संस्थेच्या उद्देशालाच बाधा येईल, असेही निर्णयात स्पष्ट केले.
पहिल्या कमिटीचा कार्यकाल संपल्यानंतर नवीन कमिटी स्थापन होते. मात्र नवीन आलेल्या कमिटीकडून जुन्या कमिटीने केले ठराव रद्द करून त्यात बदल करून आपल्या मर्जीचे ठराव करण्यात काही ग्रामपंचायतीचे कारभारी बदल करतात मात्र जुन्या कमिटीने केलेले ठराव बदलण्याचा अधिकार नवीन कमिटीला नाही. असा निर्णय नुकताच एका खंडपीठाने दिला आहे.
सध्याचे राजकारण पाहता नवीन कमिटी आल्यानंतर आपल्या फायद्याच्या दृष्ठीने ठराव कसा करता येईल व जुना ठराव कसा मोडीत काढता येईल याकडे काही सरपंच प्रयत्न करत असतात. मात्र तसे केल्यास कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असेही या निर्णयामध्ये सांगितले आहे. यामुळे अनेक ग्रा.पं च्या कारभाऱ्यांना चाप बसणार हे मात्र निश्चित. सध्या गुहागर तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतमध्ये अशा ठरावांना बगल देऊन मनमानी करत असल्याचे समजते. तसे केल्यास त्यांच्यावरही या निर्णयाची टांगती तलवार असणार आहे.
चौकट : खंडपीठाचा निर्णय
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. केवळ नवीन कारभारी आले म्हणून आधीचे ठराव रद्द करता येणार नाहीत. अन्यथा ग्रामपंचायतीच्या प्रशासनात अराजकता माजेल. जर आधीचे ठराव खोटे किंवा बनावट वाटले तर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी लागेल, त्यानंतरच पूर्वनिर्णयांवर हरकत घेता येईल.