गणेशोत्सवाकरिता महावितरण सज्ज
👉 रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखभाल दुरुस्तीची अनेक कामे पूर्ण
रत्नागिरी / सिंधुदुर्ग-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन काहीच दिवसांत होणार असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा यासाठी महावितरण ने देखभाल दुरुस्तीची अनेक कामे केली आहेत. तसेच आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास आवश्यक असणारे साहित्य व मनुष्यबळ शाखा कार्यालय पर्यंत उपलब्ध ठेवण्याचे तसेच अधिकारी व कर्मचारी यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याची आदेश महावितरणकडून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरणने दोन्ही जिल्ह्यात देखभाल दुरुस्तीची विशेष मोहीम राबवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 249 नादुरुस्त रोहित्रे बदलली, 72 वितरण पेट्या बदलल्या, वीज वाहिन्या तुटून अपघात होऊ नये म्हणुन 10,825 स्पेसर्स बसवले, 717 पोल बदलले तसेच लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांच्या शेजारी असणाऱ्या व वीज यंत्रणा प्रभावित करणाऱ्या वृक्षांची छाटणी केली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 23 वितरण पेट्या बदलल्या, वीज वाहिन्या तुटून अपघात होऊ नये म्हणुन 2300 स्पेसर्स बसवले, 158 पोल बदलले तसेच लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांच्या शेजारी असणाऱ्या व वीज यंत्रणा प्रभावित करणाऱ्या वृक्षांची छाटणी केली आहे. यामुळे गणेशोत्सव काळात नागरिकांना अखंड वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा
आपत्कालीन स्थितीत किंवा पाऊस व वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा बाधित झाल्यास नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी संबंधित कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. आपात्कालीन स्थितीत महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912 / 1800-212-3435 / 1800-233-3435 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मंडळांनी अधिकृत जोडणी घ्यावी.
महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीज पुरवठ्याच्या वीजदरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे. गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. वीजपूरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे. जवळच्या वीज खांबावरून किंवा वीज वाहिन्यांवरून अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानीचा संभाव्य धोका अधिक आहे. ठिकठिकाणी जोड असणारी किंवा तुटलेल्या किंवा लूज वायर वापरू नयेत. वायारीस जोड देण्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप वापरावा. भक्तांच्या सूरक्षेच्या कारणास्तव गणेश मंडळांनी वीज सुरक्षा उपाययोजनांबाबत तडजोड करू नये.