पनवेल वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; चेंबूरमधून चोरी झालेली स्कुटी ‘डेरवली’मध्ये पकडली
संशयास्पदरीत्या पेट्रोल भरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी लावले जेरबंद; वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
नवी मुंबई (मंगेश जाधव):
रस्त्यावर वाहतूक नियमन करत असताना दाखवलेली सतर्कता आणि संशयास्पद हालचालींवर ठेवलेल्या बारकाईने लक्षामुळे पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी एका चोरीच्या स्कुटीचा छडा लावला आहे. चेंबूर भागातून चोरी झालेली ही स्कुटी पनवेलमधील डेरवली परिसरातून हस्तगत करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
**नेमकी घटना काय?**
पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीतील डेरवली येथे पोलीस हवालदार वाघमारे (बकल नं. 2614) आणि पोलीस हवालदार घाडगे (बकल नं. 2358) हे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना विना नंबर प्लेटची एक पांढऱ्या रंगाची ‘एक्सेस 125’ स्कुटी बेवारस अवस्थेत उभी दिसली. दोन्ही बाजूंना नंबर प्लेट नसल्याने पोलिसांना संशय आला.
**असा रचला सापळा:**
काही वेळातच एक अनोळखी व्यक्ती त्या स्कुटीजवळ आली आणि स्क्रू ड्रायव्हरने हँडल तोडून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागली. गाडी सुरू न झाल्याने त्या व्यक्तीने कचऱ्यातील एक रिकामी बाटली उचलली आणि पेट्रोल आणण्यासाठी निघून गेला. हवालदार वाघमारे आणि घाडगे यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक **औदुंबर पाटील** यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक **जीवन शेरखाने** यांना घटनास्थळी रवाना केले.
काही वेळातच तो इसम बाटलीत पेट्रोल घेऊन परतला आणि गाडीत टाकू लागला. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
**चेंबूरमध्ये झाला होता गुन्हा दाखल:**
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी स्कुटीची डिकी तपासली असता त्यात वाहनाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स सापडल्या. त्या आधारे मूळ मालकाशी संपर्क साधला असता, सदर स्कुटी (क्रमांक MH03DT4722) ही २७ मार्च २०२६ रोजी चेंबूरच्या आरसीएफ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाली असल्याचे समोर आले. याप्रकरणी तेथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा (रजि. नं. ०१९१/२०२६) दाखल होता.
**पुढील कारवाई:**
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मदतीसाठी कर्मचारी बोलावून घेतले. सध्या संशयित आरोपी, चोरीची स्कुटी आणि त्याचा मोबाईल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जीवन शेरखाने, पोलीस हवालदार वाघमारे आणि घाडगे यांनी केली आहे.
**#PanvelPolice #NaviMumbaiNews #CrimeUpdate #VahatukPolice #PanvelCity #TheftCase
#PoliceAlert**















