आबलोली येथे ‘स्वरचैतन्य ग्रुप’ तर्फे दिवाळी पहाटेचे आयोजन..!
आबलोली (संदेश कदम) ….
स्वरचैतन्य ग्रुप, आबलोली तर्फे दिवाळी पहाट आणि रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वासुदेव पांचाळ यांचे निवासस्थान, साई माऊली गॅरेजच्या शेजारी, पांचाळवाडी येथे करण्यात आलेले आहे. दिवाळी पहाटचे हे सातवे वर्ष असून विविध उपक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीचे औचित्य साधून ‘स्वरचैतन्य रंगत कलांची-संगत सुरांची’ या भावनेने आबलोली परिसरातील कलारसिकांसाठी दिवाळी पहाट,रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच ऑनलाईन किल्ला बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता सुरमयी दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग असून त्यांना नामवंत कलाकारांची साथ संगत लाभणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता रांगोळी स्पर्धा प्रदर्शन सुरू होणार आहे. दुपारी तीन वाजता कलाकार कौस्तुभ सुतार यांचे शिल्प प्रात्याक्षिक सादरीकरण होणार आहे. त्यानंतर स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता ‘अभिजात मराठी’ या विषयावर प्रा.अमोल पवार हे रसिकांसोबत संवाद साधणार आहेत.
या सर्व उपक्रमांना कलारसिकांनी उपस्थित राहून दाद द्यावी असे आवाहन स्वरचैतन्य ग्रुप तर्फे संदेश पांचाळ, गिरीश पांचाळ यांनी केले आहे.