रत्नागिरी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवा-पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
भरारी-बैठे पथकासह अधिकाऱ्यांची 111 पथके; 16 हजार 54 बारावीचे तर 18 हजार 388 दहावीचे विद्यार्थी
रत्नागिरी– राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या आजपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 16 हजार 54 विद्यार्थी बारावी तर 18 हजार 388 विद्यार्थी दहावी परीक्षेला सामोरे जात आहेत. या परीक्षेसाठी 73 जिल्हास्तरीय भरारी पथकांची तसेच 38 बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज मंगळवारपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ही परीक्षा 18 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षांसाठी 13 परिरक्षक कार्यालये आहेत. उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात 163 कनिष्ठ महाविद्यालये असून 38 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 54 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. जिल्ह्यात एकूण 434 माध्यमिक शाळा असून 73 परीक्षा केंद्रावर 38 हजार 388 दहावीचे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. जिल्ह्यात मागील पाच वर्षामध्ये एकही संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्र आढळून आलेले नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत यांनी दिली आहे.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विद्यार्थ्यांसाठी एक पत्र लिहून आवाहन केले आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, प्रिय विद्यार्थ्यांनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत मा. शिक्षणमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वांत मोठा आधारस्तंभ आहे. परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणाने परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे.
उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी. परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटिबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवा-पालकमंत्री डॉ. उदय सामंत.