रत्नागिरीत आजपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ : १८,८३४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून (२१ फेब्रुवारी) प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील १८,८३४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून ७३ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुरळीत आणि शिस्तबद्ध आयोजनासाठी राज्य आणि विभागीय मंडळाने विशेष नियोजन केले आहे.
कॉपीमुक्त परीक्षा अभियानावर भर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. गैरमार्गांचा वापर रोखण्यासाठी भरारी पथके आणि बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
कडक नियम आणि शिस्तबद्ध संचलन
दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हे मिशन हाती घेतले आहे. विभागीय मंडळाने शाळा प्रमुख, गटशिक्षणाधिकारी, परिरक्षक आणि केंद्र संचालकांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण जाणवू नये म्हणून डिसेंबरपासूनच विविध उपक्रम राबवले गेले. कॉपीमुक्ती शपथ, पालक बैठका, ऑनलाइन उद्बोधन कार्यक्रम, व्हिडिओ निर्मिती, तसेच राज्यस्तरीय जनजागृती सप्ताह असे विविध उपक्रम घेण्यात आले.
दक्षता समितीची कडक नजर
जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता समित्या आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारावी परीक्षेसाठी उचललेल्या प्रभावी पावलांमुळे सकारात्मक परिणाम दिसून आला असून, त्याच धर्तीवर दहावीच्या परीक्षा देखील सुरळीत पार पडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नियोजनबद्ध परीक्षा – विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
तालुका, परीक्षा केंद्र आणि शाळा स्तरावर काटेकोर नियोजन केल्याने परीक्षा शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडणार आहे. परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!