शिंदेंच्या ठाण्यात भाजपची फिल्डिंग? गणेश नाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, भाजपने आता या ठिकाणी आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. ठाण्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवल्यानंतर भाजपने आता वरिष्ठ नेत्यांना सक्रिय करत पक्षविस्ताराला गती दिली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार सुरू केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे की, भाजप शिंदे गटाच्या प्रभावाला आव्हान देत आहे का?
गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार आयोजित करताना स्पष्ट केले की, “मी 15 वर्षे पालकमंत्री होतो. त्या काळातही मी नियमितपणे जनता दरबार घेत असे. आता भाजप सरकार 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेत आहे आणि जनतेशी संवाद साधत आहे. यात कुठलाही राजकीय हेतू नाही.”
मात्र, विरोधकांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, ठाण्यात भाजप जाणीवपूर्वक मोठ्या नेत्यांना पुढे करत आहे, जेणेकरून एकनाथ शिंदे यांच्या प्रभावाला आव्हान देता येईल. या पार्श्वभूमीवर जेव्हा गणेश नाईक यांना विचारण्यात आले की, भाजप शिंदे गटाचे वर्चस्व कमी करत आहे का, तेव्हा त्यांनी महत्त्वाचे विधान केले.
“राजकारणात कायमस्वरूपी कुणा एकाचाच प्रभाव राहत नाही. चढ-उतार हे येतच असतात. ठाण्यात पूर्वी रामभाऊ माळगे, रामभाऊ कापसे, मी स्वतः पालकमंत्री होतो. त्यामुळे इथे कोणाचेही एकछत्री राज्य राहणार नाही. जनता ज्याला पसंती देईल, तो पुढे जाईल,” असे सूचक विधान त्यांनी केले.
गणेश नाईक यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजप-शिंदे गटाच्या संबंधांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील नेते या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.