राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा समन्स – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे कारवाई
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या प्रकरणात नाशिक न्यायालयाने समन्स बजावले आहे. कोर्टाने त्यांना ऑनलाइन उपस्थिती न दर्शवता प्रत्यक्षरित्या हजर राहण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे.
नेमके प्रकरण काय?
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान हिंगोली (8 ऑक्टोबर 2022) आणि अकोला (17 नोव्हेंबर 2022) येथील सभांमध्ये सावरकरांवर टीका केली होती. त्यांनी सावरकर फक्त दोन-तीन महिने तुरुंगात होते आणि त्यांनी स्वतःचे जीवनचरित्र आपल्या सहकाऱ्यांमार्फत लिहून घेतले, असा दावा केला होता. तसेच, सावरकरांचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
या वक्तव्यामुळे निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने भुतडा यांनी नाशिक न्यायालयात दावा दाखल केला.
न्यायालयाचा आदेश आणि पुढील प्रक्रिया
या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार भुतडा यांचा जबाब नोंदवला असून, पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. कोर्टाने राहुल गांधी यांना या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदारांचा युक्तिवाद
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानच्या सेलुलर जेलमध्ये तब्बल 12 वर्षं होते. 6 जानेवारी 1924 रोजी त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. त्यामुळे राहुल गांधी यांचा दावा चुकीचा आहे. “स्वातंत्र्यवीर” ही पदवी त्यांनी स्वतः सहकाऱ्याकडून लिहून घेतली, हा आरोपही निराधार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, सावरकर हयात असताना भाजप अस्तित्वात नव्हते आणि ते हिंदू महासभेचे नेते होते, त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन आहेत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
राहुल गांधींनी माफी मागावी की पुरावे द्यावे?
तक्रारदारांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे की, राहुल गांधी यांनी या आरोपांबाबत माफी मागावी किंवा आपले दावे सिद्ध करणारे पुरावे सादर करावेत. या प्रकरणात पुढील सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार असून, राहुल गांधी यांच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
.
– प्रतिनिधी, नाशिक