संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

मुंबई, ५ मार्च: छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडण्यात आले होते, त्या ऐतिहासिक स्थळी त्यांचे भव्य आणि यथोचित स्मारक उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेमध्ये केली.
विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक, शूर सेनानी आणि पराक्रमाचे प्रतीक होते. त्यांच्या वीरतेला साजेसे स्मारक उभारण्याचा सरकारचा मानस आहे.”
स्मारकासाठी अतिरिक्त जागेचे अधिग्रहण शक्य.
स्मारकासाठी आवश्यक जागा कमी पडत असल्यास त्यासाठी नजीकची अतिरिक्त जमीन अधिग्रहित केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्याच्या परिसरात हे स्मारक उभारले जाणार आहे.
विधानपरिषदेत विषयावर चर्चा….
या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ, भावना गवळी आणि प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हटले,
“देश धरमपर मिटने वाला। शेर शिवाका छावा था।।
महा पराक्रमी परम प्रतापी। एकही शंभू राजा था॥”
यामुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून या ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीला लवकरच गती मिळणार आहे.















