मांडकी खुर्द जिल्हा परिषद शाळेला ‘आदर्श शाळा २०२५’ पुरस्काराचा सन्मान

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मांडकी खुर्द मराठी शाळेने आपल्या शैक्षणिक उत्कृष्टतेची नवी उंची गाठली असून, या वर्षीच्या ‘रत्नागिरी जिल्हा आदर्श शाळा २०२५’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात या शाळेने भरीव योगदान दिले आहे.
या उल्लेखनीय यशामागे मुख्याध्यापिका मीना विचारे, पदवीधर शिक्षक दत्तात्रय नार्वेकर, तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र घाणेकर, तसेच शिक्षिका विद्या कसबेकर यांचे विशेष परिश्रम आहेत. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शाळेने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे.
शाळेच्या प्रगतीत केंद्रप्रमुख कवितके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश डिके, तसेच ग्रामस्थ श्रीराम घाणेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पाठबळामुळेच शाळेने सर्व स्तरांवर उत्कृष्ठ कामगिरी बजावली.
हा सन्मान मिळवून शाळेने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला अभिमान वाटावा असे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेने घेतलेले पुढाकार आणि नवोपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतील.