उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा अविश्वास प्रस्ताव
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. साहित्य संमेलनातील वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला.
काय आहे प्रकरण?
साहित्य संमेलनात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे ठाकरे गट नाराज आहे. त्यानंतर त्या पक्षाच्या निशाण्यावर आल्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करून त्यांचा विरोध दर्शवला आहे.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अविश्वास प्रस्ताव आणायला खरा उशीरच झाला आहे. आतापर्यंत त्यांना निलंबित व्हायला हवे होते. प्रस्ताव आल्यावर त्याच अधिवेशनात चर्चा अपेक्षित असते, त्यामुळे हा मुद्दा समोर येईल. पक्षांतराचाही हा एक मोठा मुद्दा आहे.”
आता पुढे काय?
महाविकास आघाडीने आणलेल्या या प्रस्तावावर विधान परिषद सभापती लवकरच निर्णय घेणार आहेत. डॉ. नीलम गोऱ्हे तीन दिवसांपासून आजारी असून, त्या सभागृहात अनुपस्थित आहेत. आता हा प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारला जातो का आणि पुढे काय होणार, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.