विरारमध्ये कोकणचे खेळे होळीसाठी सज्ज! कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विरारमध्ये कोकणचे खेळे होळीसाठी सज्ज!
कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण

विरारमध्ये कोकणचे खेळे होळीसाठी सज्ज!
कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण

विरार (मंगेश जाधव प्रतिनिधी) – कोकणातील पारंपरिक सणांपैकी एक असलेल्या होळीचा जल्लोष विरारमध्येही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोकणवासीय आपल्या परंपरांना जीवंत ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचे खेळे आयोजित करत आहेत. विरार पूर्वेतील कारगिल नगर, मनवेल पाडा, फुलपाडा, नाना-नानी पार्क परिसरात गोमू, संकासुर आणि अन्य कलाकार पारंपरिक गाण्यांच्या तालावर नृत्य करीत या उत्सवाला रंगत आणणार आहेत.

मुंबई आणि उपनगरात कोकणातील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक राहतात. आपल्या मातृभूमीशी नाळ कायम ठेवण्यासाठी ते कोकणी सण आणि परंपरा मोठ्या प्रमाणावर जपतात. होळीच्या निमित्ताने ‘कोकणचे खेळे’ हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये पारंपरिक वेशभूषा, ढोलकीचा गजर आणि गावरान लोककला सादर केली जाते.

गुहागर तालुक्यातील विसापूर, पाटपन्हाळे, पेवे, पालकोट आणि आसपासच्या गावांतील नागरिक या कलेला पुढे नेत आहेत. स्थानिक रहिवासी आणि तरुणवर्गही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतो.

या परंपरेविषयी बोलताना हेमंत गुरव म्हणाले, “कोकणचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोकणचे खेळे ही केवळ एक कला नसून आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.”

विरारमध्ये रंगपंचमीला कोकणच्या पारंपरिक खेळ्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक कोकणप्रेमी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाची होळी देखील पारंपरिक गाण्यांच्या तालावर नृत्य आणि जल्लोषाने नक्कीच संस्मरणीय ठरणार आहे!

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...